मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार, आमिर आणि त्याची मैत्रीण गौरी गेल्या वर्षभरापासून एकत्र राहत असून त्यांनी एक आनंदी आणि स्थिर आयुष्य उभारले आहे. आता या नात्याला अधिकृत स्वरूप देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. या दोघांचा विवाह ५ जुलै रोजी आमिर खानच्या निवासस्थानी अत्यंत खासगी आणि कौटुंबिक वातावरणात पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असली तरी विवाहाबाबतची माहिती सध्या चर्चेपुरतीच मर्यादित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४७ वर्षीय गौरी यांना त्यांच्या पूर्वीच्या विवाहातून सात वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे आजोबा फिलिप स्प्रेट हे ब्रिटनमध्ये जन्मले होते आणि १९२० मध्ये भारतात आले होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला होता. यापूर्वी आमिर खानने रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. त्यांना जुनैद खान आणि इरा खान अशी दोन मुले आहेत. त्यानंतर त्यांनी चित्रपट निर्माती किरण राव यांच्याशी दुसरे लग्न केले होते. या दाम्पत्याला आझाद नावाचा मुलगा असून २०२१ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आमिर तिसऱ्यांदा विवाह करणार असल्याच्या चर्चांनी बॉलिवूडमध्ये रंग भरले आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी कोणतीही पत्रकार परिषद किंवा अधिकृत घोषणा केलेली नसून सध्या केवळ ५ जुलैची संभाव्य तारीख आणि कौटुंबिक सोहळ्याची माहितीच समोर आली आहे.







