मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत बांद्रा पूर्व येथील कार्डिनल ग्रेशियस हायस्कूलमध्ये झालेल्या “६ तासांची नॉन स्टॉप रिले मॅरेथॉन” स्केटिंग मरेथॉनमध्ये सलग ६ तास स्केटिंग करण्याचा विक्रम नोंदविण्यात आला आहे. हा स्वातंत्र्य दिन क्रीडाविश्वाला साजेसा असा साजरा करण्यात आला. येथील द स्क्वॉड अँकेडमीने आजवर शाळेला क्रीडा क्षेत्रात एक चांगला दर्जा प्राप्त करून दिला आहे. याच आपल्या लौकिकाला अनुसरून भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कार्डीनल ग्रेशियस हायस्कूलमध्ये “६ तासांची नॉन स्टॉप रिले मॅरेथॉन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेत द स्क्वॉड अँकेडमीच्या सर्व वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या मॅरेथॉनची आणि त्यात सहभागी सर्व स्केटर्सची जगप्रसिद्ध इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या मानाच्या बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे आयोजन द स्क्वॉड अँकेडमीचे प्रशिक्षक श्री. निखिल सर आणि श्री. यश सर यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी यशस्वीपणे पार पडले. इतर खेळांप्रमाणेच मुलांमध्ये स्केटिंग ची रुची निर्माण व्हावी तसेच त्यांच्यातील स्केटिंग खेळाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी द स्क्वॉड अकादमी सदैव कार्यरत असते.
सदर स्पर्धेस सकाळी नऊ वाजता कार्डिनल ग्रेशियस हायस्कूलमध्ये आरंभ करण्यात आला. या स्पर्धेमध्ये काही स्पर्धकांनी हातात भारताचा तिरंगा ध्वज घेऊन स्केटिंग करत भारताच्या स्वातंत्र्य दिनाला मानवंदना दिली. हे दृश्य पहाताक्षणी अतिशय सुंदर मनमोहक वाटत होते. स्पर्धकांनी सलग सहा तास स्केटिंग केल्यानंतर या स्पर्धेची सांगता झाली. या अश्या अद्भुत स्पर्धेची नोंद जगप्रसिद्ध ‘द इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ या बुकमध्ये करण्यात आली. ही गोष्ट खरोखरच कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल, द स्क्वॉड अँकेडमी आणि स्पर्धकांसाठी अतिशय अभिमानाची आहे. या स्पर्धेत काही पालकांनीही यथायोग्य सहकार्य केले. स्पर्धा संपल्यावर कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल मध्येच पारितोषिक वितरण समारंभ साजरा करण्यात आला. सदर मॅरेथॉन स्केटिंग स्पर्धेला वेळोवेळी सहकार्य करणारे कार्डिनल ग्रेशियस हायस्कूलचे प्रमुख फादर रॉक मायकल यांनी सुद्धा उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवले. सर्व स्पर्धकांना पारितोषिक वितरण फादर रॉक मायकल, टीचर रेश्मा, डॉक्टर नरेश तांबे तसेच खेरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. विजय वढे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. “६ तासांची नॉन स्टॉप रिले मॅरेथॉन” या स्पर्धेची नोंद ‘द इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ या बुकमध्ये करण्यात आली असल्यामुळे इतर खेळांप्रमाणेच आता स्केटिंगलाही सुवर्ण दिवस नक्की प्राप्त होणार. तेव्हा निखिल सर आणि यश सर तुमचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.