रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (केआरसीएल) प्रवासी सुरक्षेसाठी व्यापक तयारी सुरू केली आहे. पावसाळ्यात रेल्वे वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून रेल्वे मार्गावरील संवेदनशील आणि अतिजोखमीच्या भागांमध्ये रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच असुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी २४ तास स्थिर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे मान्सून काळात रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ३ जून रोजी रत्नागिरी येथे कोकण रेल्वेच्या सुरक्षा विभागामार्फत विशेष सुरक्षा चर्चासत्र आणि मान्सून पेट्रोलिंगचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पावसाळ्यात रेल्वे मार्गावरील संभाव्य धोक्यांबाबत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सज्ज ठेवणे हा होता. पावसामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक अडचणींना वेळेत प्रतिसाद देऊन कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पेट्रोलमनवर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील रेल्वे मार्गावर पायी फिरून बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माती खचणे, दरडी कोसळणे, मोठे दगड रुळांवर येणे, पाणी साचणे किंवा रेल्वे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी कोणतीही असामान्य घटना आढळल्यास संबंधित पेट्रोलमन तात्काळ जवळच्या स्टेशन मास्तरांना माहिती देतात. प्रत्येक पेट्रोलमनकडे सुमारे पाच किलोमीटरचा परिसर तपासणीसाठी सोपविला जातो. गस्तीदरम्यान आपल्या हद्दीच्या शेवटी पोहोचल्यानंतर तो शेजारच्या विभागातील पेट्रोलमनसोबत ‘पेट्रोल डायरी’ची अदलाबदल करतो. ही डायरी एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनपर्यंत सुरक्षितपणे पोहोचणे म्हणजे संबंधित रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी भूषविले, तर संचालक (वे अँड वर्क्स) राजीव कुमार मिश्रा यांनी मान्सून काळातील सुरक्षित रेल्वे संचालनासाठी रात्रीच्या गस्तीचे महत्त्व अधोरेखित केले.







