नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि युवक सहभागी होत असल्याने परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शनिवार-रविवारच्या सुटीमुळे आंदोलनस्थळी गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर आणि संसद परिसरातील १८ मेट्रो स्थानके तात्पुरती बंद ठेवण्यात आल्याने आंदोलनस्थळी पोहोचण्यासाठी प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. मेट्रो सेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिक ऑनलाइन कॅब आणि दुचाकी टॅक्सी सेवांकडे वळले असून, मागणीत झालेल्या वाढीमुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या सेवांच्या भाड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एखाद्या भागात प्रवाशांची मागणी अचानक वाढल्यास आणि उपलब्ध वाहनांची संख्या तुलनेने कमी असल्यास ‘सर्ज प्रायसिंग’मुळे भाडे वाढते. त्यामुळे जंतर-मंतरकडे जाणाऱ्या प्रवाशांना नेहमीपेक्षा अधिक खर्च करावा लागत आहे. उपलब्ध माहितीनुसार, गाझियाबादहून जंतर-मंतरपर्यंत दुचाकी टॅक्सीचे भाडे सुमारे ₹२५० ते ₹३००, इकॉनॉमी कॅबचे ₹५०० ते ₹५५०, प्रायोरिटी कॅबचे ₹६०० ते ₹६५०, प्रीमियम कॅबचे ₹६५० ते ₹७०० आणि एक्सएल कॅबचे ₹९०० ते ₹१,००० इतके आकारले जात आहे. नोएडाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी दुचाकी टॅक्सीचे भाडे ₹२०० ते ₹२५०, ऑटो ₹३०० ते ₹३५०, इकॉनॉमी कॅब ₹४५० ते ₹५००, प्रायोरिटी ₹५०० ते ₹५५०, प्रीमियम ₹५५० ते ₹६५० आणि एक्सएल कॅब ₹७५० ते ₹८०० दरम्यान असल्याचे दिसून येत आहे.
गुरुग्रामहून जंतर-मंतरकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही वाढीव भाड्याचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर दुचाकी टॅक्सीचे भाडे ₹३५० ते ₹४००, इकॉनॉमी कॅब ₹५५० ते ₹६००, प्रायोरिटी कॅब ₹५८० ते ₹६५०, प्रीमियम कॅब ₹६०० ते ₹७५० आणि एक्सएल कॅब ₹८५० ते ₹९०० इतके आकारले जात असल्याचे समोर आले आहे. अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी प्रवाशांनी सुरू असलेल्या जवळच्या मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करून तेथून ऑटो किंवा कॅबद्वारे जंतर-मंतर गाठण्याचा पर्याय निवडू शकतात. त्यामुळे एकूण प्रवासाचा खर्च काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र, बंद स्थानकांमुळे अंतिम टप्प्यात रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत असल्याने गर्दी आणि वाढीव भाड्याचा परिणाम पूर्णपणे टाळणे शक्य नसल्याचे चित्र आहे. आंदोलनामुळे राजधानीतील वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढला असून, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.






