मुंबई : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) गेल्या काही महिन्यांत मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागले असून, वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १८ जुलैपासून लागू झाली असून, त्यामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांच्या प्रवासखर्चात वाढ होणार आहे. आधीच महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असताना आता एसटीच्या भाडेवाढीमुळे त्यांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. विशेष म्हणजे, येत्या गणेशोत्सवात मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातून कोकणातील गावी जाणाऱ्या हजारो प्रवाशांनाही या वाढीव दरांचा फटका बसणार आहे. एप्रिल, मे आणि जून या सलग तीन महिन्यांत एसटी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. जून महिन्यातच महामंडळाचा तोटा ९१.१८ कोटी रुपयांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तोट्यात जवळपास ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विविध उत्पन्नवाढीचे प्रयोग करूनही आर्थिक परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने राज्य परिवहन प्राधिकरणाने १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमधील वाढ, वाहनांचे सुटे भाग, टायर तसेच देखभाल-दुरुस्तीवरील वाढता खर्च यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच यापूर्वी साध्या बससेवेवर लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी नवीन दरपत्रक लागू करण्यात आले आहे.
नवीन भाडेदरांनुसार अनेक प्रमुख मार्गांवरील प्रवास महागला आहे. मुंबई–सातारा आणि मुंबई–चिपळूण या मार्गांवरील भाडे ४९८ रुपयांवरून ५१५ रुपये झाले आहे. मुंबई–कोल्हापूर मार्गाचे भाडे ७३० रुपयांवरून ७५५ रुपये, मुंबई–नाशिक ३५५ रुपयांवरून ३७० रुपये, मुंबई–धुळे ६६४ रुपयांवरून ६८५ रुपये, तर मुंबई–सोलापूर मार्गावर आता थेट ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे–कोल्हापूर मार्गाचे भाडे ४२१ रुपयांवरून ४३५ रुपये, पुणे–अहिल्यानगर २३३ रुपयांवरून २४० रुपये, पुणे–संभाजीनगर ४५४ रुपयांवरून ४७० रुपये, पुणे–सोलापूर ४६५ रुपयांवरून ४८० रुपये आणि नाशिक–पुणे मार्गाचे भाडे ४१० रुपयांवरून ४२५ रुपये करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवासी एसटीची निवड करतात. अनेक प्रवासी गट आरक्षण करून बस आरक्षित करतात. मात्र, नव्या भाडेवाढीमुळे या प्रवाशांना अधिक खर्च करावा लागणार असून, नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागेल. अचानक लागू झालेल्या या भाडेवाढीमुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत असून, महामंडळाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणीही अनेक प्रवाशांकडून केली जात आहे.






