मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे पुनरीक्षणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यास अडचणी निर्माण झाल्याने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी मुदतवाढ देण्याची विनंती आयोगाकडे केली होती. ही विनंती मान्य करत आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया नव्या वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे. सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मतदारांच्या गृहभेटी घेऊन पडताळणीचे काम करतील. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि आवश्यक त्या पुनर्रचनेची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात येणार आहे. या विशेष पुनरीक्षण मोहिमेचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त ठेवण्याचा असून, पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत तसेच अपात्र नोंदी दूर करण्यात याव्यात, यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांकडून दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधितांना नोटिसा देणे, सुनावणी घेणे आणि प्राप्त दावे-हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सर्व दावे व हरकतींची छाननी झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ (सोमवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी सर्व पात्र नागरिकांना निर्धारित कालावधीत गणना प्रपत्र भरून आवश्यक माहिती सादर करण्याचे आणि मतदार यादीत नाव समाविष्ट करणे किंवा आवश्यक दुरुस्त्या करून घेण्यासाठी निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांनी निश्चित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करून आपला मतदानाचा घटनात्मक अधिकार सुरक्षित ठेवावा, असेही नमूद केले.






