डोंबिवली : डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी रमेश म्हात्रे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र शाखेने सोमवार २० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून मंगळवार २१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांच्या राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे. या आंदोलनादरम्यान राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि नियोजित शस्त्रक्रिया (Elective Surgeries) पूर्णपणे बंद राहणार आहेत. मात्र, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (ICU), प्रसूती सेवा आणि इतर जीवनावश्यक वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे. या आंदोलनात केवळ ॲलोपॅथी डॉक्टरच नव्हे, तर आयुर्वेद, होमिओपॅथी क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका आणि विविध वैद्यकीय संघटनाही सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील आरोग्य सेवांवर या आंदोलनाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी महिला डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने डॉक्टर संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप करत आयएमएने सरकारसमोर चार प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये आरोपी आणि त्यांच्या समर्थकांवर कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय कठोर कायदेशीर कारवाई करणे, या प्रकरणाचा तपास ३० ते ६० दिवसांत पूर्ण करून जलदगती न्यायालयात खटला चालवणे, सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये २४ तास प्रशिक्षित सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी देशभर लागू होईल असा केंद्रीय संरक्षण कायदा तातडीने लागू करणे, या मागण्यांचा समावेश आहे. डॉक्टर संघटनांचे म्हणणे आहे की, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळाल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. त्यामुळे सरकारने या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे.





