सातारा : कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे रूप हाणामारीत झाल्याने उत्सवाला गालबोट लागले. मोठ्या आवाजात गाणी वाजवणे आणि मिरवणुकीजवळ फटाक्यांची माळ लावण्याच्या कारणावरून नवभारत गणेश मंडळ आणि धनराज गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी रात्री जोरदार संघर्ष झाला. ही घटना बिरोबा मंदिर चौकात घडली. कराड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मंडळांच्या मिरवणुका एकाच ठिकाणी आल्यानंतर ध्वनीप्रदूषणावरून वाद सुरू झाला. त्यानंतर एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मंडळाच्या मिरवणुकीजवळ फटाक्यांची माळ लावल्याने तणाव आणखी वाढला आणि दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की व हाणामारी झाली. घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि डॉल्बी तसेच बँड बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी दोन्ही मंडळांतील एकूण १६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कारवाई करताना दोन्ही मंडळांचे डॉल्बी साऊंड सिस्टीम, बँडचे साहित्य, जीप आणि ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. कराड तालुका पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडेल, सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल किंवा मानवी जीविताला धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण आणि मिरवणुकांसंदर्भात घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.






