पुणे : शासकीय एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट रेखाकला (Drawing Grade) परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदापासून प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आदल्या दिवशी न देता, परीक्षेच्या दिवशीच संबंधित केंद्रप्रमुखांच्या लॉगिनवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यानंतर केंद्रप्रमुखांनी त्या डाउनलोड करून मुद्रित प्रती विद्यार्थ्यांना वितरित कराव्या लागतील. मंडळाचे संचालक विनोद दांडगे यांनी याबाबत परिपत्रक जारी केले असून, २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यातील तसेच राज्याबाहेरील परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. यापूर्वी २२ सप्टेंबरच्या परिपत्रकात प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना न देता प्रश्न फळ्यावर लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, शिक्षक, पालक आणि संबंधितांकडून हरकती नोंदवल्यानंतर मंडळाने हा निर्णय बदलत विद्यार्थ्यांना मुद्रित प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार एलिमेंटरी परीक्षेसाठी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता ‘वस्तुचित्र’ आणि सकाळी ९.३० वाजता ‘स्मरणचित्र’, तर २९ सप्टेंबर रोजी ‘संकल्पचित्र-नक्षीकाम’ आणि ‘कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन’ या विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील. इंटरमिजिएट परीक्षेसाठी ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे ‘स्थिरचित्र’, ‘स्मरणचित्र’, ‘संकल्पचित्र-नक्षीकाम’ तसेच ‘कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन’ या विषयांच्या प्रश्नपत्रिका केंद्रप्रमुखांना परीक्षेच्या वेळेनुसार पाठवण्यात येतील.
परीक्षेदरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याचा वेळ वाया जाऊ नये यासाठी मंडळाने केंद्रप्रमुखांना विशेष सूचना दिल्या आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठा किंवा इंटरनेट सेवेमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रश्नपत्रिका डाउनलोड करणे आणि छायांकित प्रती तयार ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था आधीच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्याची संपूर्ण जबाबदारी केंद्रप्रमुखांवर असेल. तसेच विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांच्या छपाईसाठी प्रति विद्यार्थी १० रुपये इतका खर्च मंडळाकडून ऑनलाइन देयक सादर केल्यानंतर मंजूर केला जाणार आहे. परीक्षा केंद्रांवर कला संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या भरारी पथकांकडून देखरेख ठेवली जाणार असून, स्थानिक पोलीस ठाण्यालाही परीक्षेच्या नियोजनाची पूर्वकल्पना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या वर्षापर्यंत प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आदल्या दिवशी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. मात्र, या सुविधेचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने यंदापासून प्रश्नपत्रिका थेट परीक्षेच्या दिवशीच उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या प्रणालीमुळे पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल आणि परीक्षेची गोपनीयता व पारदर्शकता अधिक प्रभावीपणे जपली जाईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे.






