वसई : करोना काळात सुरू झालेली ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धत सायबर ठकसेनांना चांगलीच पर्वणी ठरली आहे. वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून काम करून कमवा अशा भूलथापा मारून लोकांना गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत. विरारमध्ये राहणार्या एका महिलेला अशीच भूलथाप मारून १६ लाखांना गंडा घातला आहे. या प्रकरणातील ४६ वर्षीय महिला ही विरार पश्चिमेला राहते. १८ नोव्हेंबर रोजी तिने इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर एक जाहिरात पाहिली होती. घर बसल्या काम करा (वर्क फ्रॉम होम) आणि महिन्याला हजारो रुपये कमवा अशी ती जाहिरात होती. मात्र ती जाहिरात फसवी असल्याचे फिर्यादी महिलेला समजले नाही. तिने जाहिरातीला क्लिक केल्यानंततर ४ वेगवेगळ्या इन्स्टाग्राम आयडीच्या लोकांनी तिच्याशी मेसेजेसद्वारे संपर्क केला. टेलिग्रामवरील टास्क पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भरपूर पैसे मिळतील असे सांगितले. फिर्यादी महिला या भूलथापांना बळी पडली. आरोपींच्या सांगण्यानुसार ती टास्क पूर्ण करत गेली आणि त्यासाठी विविध शुल्क भरत गेली. १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या पाच दिवसांत महिलेने तब्बल १५ लाख ९६ हजार रुपये सायबर ठकसेनांना पाठवले. मात्र तिला कसलाच परतावा मिळाला नाही. उलट तिने भरलेल्या सुमारे १६ लाख रुपयांपैकी एकही रुपया मिळाला नाही. यानंतर सर्व आयडी बंद झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने सोमवारी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. अधिकृत कंपन्यांच्या संकेतस्थळांशीच व्यवहार करावा. त्याआधी खात्री करून घ्यावी अशी माहिती सायबर गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजित गुंजकर यांनी दिली आहे.