पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टर संजय मरगळे याना गुन्हे शाखेने अटक केली. ललित पाटील प्रकरणांत यापूर्वी ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह कारागृहातील रक्षकासह समुपदेशकाला गुन्हे शाखेने अटक केली होती. ललित पाटील ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत होता. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी डॉ. संजय मरगळे यांनी मदत केल्याचा संशय आहे.
ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली होती. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते मध्यस्थ म्हणून काम करत असून, त्याने रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप धंगेकर यांनी नुकताच केला होता. गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललितसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली असून, न्यायालयाने ललितसह साथीदारांना येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.