मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी आतापासूनच रेल्वे आरक्षणाची तयारी सुरू करण्याची गरज आहे. यंदा गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर रोजी साजरी होत असल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेससह अन्य नियमित गाड्यांच्या आरक्षणासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित गाड्यांमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांनी १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या आरक्षण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे, अन्यथा गणेशोत्सव काळात विशेष गाड्यांवर अवलंबून राहावे लागू शकते. कोकणातील गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण मानला जात असल्याने दरवर्षी लाखो कोकणवासी आपल्या मूळ गावी जातात. परिणामी नियमित गाड्यांमधील जागा काही मिनिटांत भरतात. विशेष गाड्या उपलब्ध असल्या तरी त्या वेळेवर पोहोचतील याची खात्री नसल्याने अनेक प्रवासी नियमित गाड्यांनाच प्राधान्य देतात.
यंदा श्रावणी अमावस्या ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८.५६ वाजता संपणार असल्याने अनेक चाकरमानी ११ सप्टेंबरच्या रात्रीपासून गावी जाण्यास सुरुवात करतील. त्यामुळे ११ सप्टेंबरच्या रात्री सुटणाऱ्या गाड्यांसाठीचे आरक्षण १३ जुलै रोजी सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे १२ आणि १३ सप्टेंबरच्या प्रवासासाठी अनुक्रमे १४ आणि १५ जुलै रोजी आरक्षण उपलब्ध होईल. गणेशोत्सवानंतर गौरी आगमन आणि पूजनासाठीही मोठ्या प्रमाणावर प्रवासी कोकणात जातात. यंदा गौरी आगमन १७ सप्टेंबरला तर गौरीपूजन १८ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे १८ सप्टेंबरपर्यंत गावी पोहोचण्यासाठी १७ सप्टेंबरला सुटणाऱ्या नियमित गाड्यांच्या आरक्षणासाठीही मोठी स्पर्धा अपेक्षित आहे. या दिवसासाठीचे आरक्षण १९ जुलै रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांमधून प्रवास करण्याचा विचार असलेल्या प्रवाशांनी आरक्षणाच्या तारखा लक्षात ठेवून वेळेत बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.







