वसई : पालघर जिल्ह्यातील वसई पूर्वेच्या मेढे परिसरात भाजीपाल्याच्या टेम्पोमधून सुरू असलेली खैर लाकडाची अवैध तस्करी वन विभागाने धाडसी कारवाई करत उधळून लावली आहे. भाताणे वनक्षेत्रांतर्गत मेढे-वडघर परिसरात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वन विभागाने विशेष नाकाबंदी केली होती. पहाटेच्या सुमारास संशयास्पद टाटा इन्ट्रा (क्रमांक MH 47 AS 2460) हा टेम्पो परिसरातून जात असताना वन कर्मचाऱ्यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत वाहन भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने सुमारे ७ ते ८ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून अखेर टेम्पोला अडवले. तपासणीदरम्यान टेम्पोच्या वरच्या भागात भाजीपाला ठेवून त्याखाली बेकायदेशीररीत्या खैर जातीचे लाकूड लपवून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. चित्रपटातील ‘पुष्पा’ शैलीची आठवण करून देणाऱ्या या तस्करीच्या पद्धतीमुळे वन अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. टेम्पोची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये १.२८४ घनमीटर क्षमतेचे एकूण ७७ खैर लाकडाचे ओंडके आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या या लाकडाची अंदाजे किंमत ₹१४,८९२ इतकी असून, लाकडासह गुन्ह्यात वापरण्यात आलेला टाटा इन्ट्रा टेम्पोही वन विभागाने जप्त केला आहे.
वन विभागाच्या पथकाने वाहन अडवल्यानंतर चालकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला असून, त्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणी संबंधितांवर वन कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई डहाणूचे उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर आणि मांडवीचे उपविभागीय वनाधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत भाताणेचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनीष महाले, वनपाल तसेच वनरक्षकांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला. वन विभागाने स्पष्ट केले आहे की, वनसंपत्तीची अवैध तस्करी रोखण्यासाठी अशा प्रकारच्या गुप्त माहितीच्या आधारे धडक मोहिमा पुढेही सुरू राहणार आहेत. नागरिकांनी जंगलातील किंवा वनसंपत्तीशी संबंधित कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या कारवाईमुळे वसई परिसरात सुरू असलेल्या अवैध लाकूड तस्करीविरोधात वन विभागाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.






