वृत्तसंस्था : ‘देऊळ बंद २’च्या बॉक्स ऑफिसवरील घवघवीत यशानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते केशव वाणी यांनी ‘देऊळ बंद ३’ची अधिकृत घोषणा केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत होणार असून ‘आत्मनिर्भर भारत’ ही त्याची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. यापूर्वी ‘अध्यात्म विरुद्ध विज्ञान’ आणि ‘शेतकरी संघर्ष’ या विषयांवर आधारित कथानकांनंतर आता परदेशात गेलेल्या भारतीय बुद्धिमत्तेला पुन्हा मायदेशी आणणे आणि देशाच्या विकासात तिचा सहभाग वाढवणे हा संदेश या चित्रपटातून दिला जाणार आहे. पहिल्या भागातील मुख्य नास्तिक शास्त्रज्ञ राघव शास्त्री हे लोकप्रिय पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ही भूमिका गश्मीर महाजनी साकारणार आहेत. त्यामुळे मालिकेतील जुने आणि नवे प्रेक्षक या चित्रपटाबाबत उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
‘देऊळ बंद २’च्या शेवटच्या दृश्यात तिसऱ्या भागाची झलक दाखवण्यात आली होती. अमेरिकेतील आपल्या कंपनीत असलेल्या राघव शास्त्रीला अक्कलकोटहून स्वामी समर्थांचा फोन येतो आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांमुळे पुढील कथानकाची उत्सुकता वाढली आहे. आता स्वामी समर्थांची प्रचिती अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर कशी दाखवली जाणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद २’ने अवघ्या सहा दिवसांत २४.६७ कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. चित्रपटाच्या यशानंतर प्रवीण तरडे यांनी कमाईतील काही हिस्सा शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची घोषणाही केली आहे. नव्या चित्रपटात प्रवीण तरडे यांच्यासह मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड, संस्कृती बालगुडे, सविता मालपेकर, महेश मांजरेकर, प्रसाद ओक आणि ओम भुटकर यांची प्रमुख भूमिका असणार आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद ३’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक भव्य आणि चर्चेचा प्रकल्प ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






