रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादकांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी ‘मंगोनेट’ प्रणालीअंतर्गत विशेष नोंदणी आणि मार्गदर्शन मोहीम लवकरच राबवण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती महेश नाटेकर यांनी दिली. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या आधुनिक आंबा निर्यात केंद्राला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृषी अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट देऊन निर्यात प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास केला. या भेटीनंतर रत्नागिरीतील हापूस आंब्याची निर्यात वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो आंबा उत्पादकांना थेट परदेशी व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्याची संधी मिळणार असून निर्यातीतील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. अभ्यास दौऱ्यात गुहागर, राजापूर आणि संगमेश्वर पंचायत समित्यांचे पदाधिकारी, कृषी अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या भेटीदरम्यान लोकप्रतिनिधींनी आंबा निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक प्रक्रियांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये आंब्याची शास्त्रोक्त प्रतवारी, स्वच्छता, आधुनिक पॅकिंग, तापमान नियंत्रित साठवणूक तसेच युरोप आणि आखाती देशांमध्ये निर्यातीपूर्वी आवश्यक असलेल्या ‘व्हेपर हीट ट्रीटमेंट’ आणि ‘इरेडिएशन’ प्रक्रियेची माहिती तज्ज्ञांकडून घेण्यात आली. निर्यात केंद्राचे व्यवस्थापक अनिमेष पाटील आणि त्यांच्या पथकासोबत झालेल्या बैठकीत परदेशातील मागणी, गुणवत्ता निकष आणि निर्यात प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा झाली. वाशीप्रमाणेच रत्नागिरीतही आवश्यक तांत्रिक सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असून, ‘मंगोनेट’ नोंदणीमुळे शेतकऱ्यांना जागतिक दर्जाचे निकष पूर्ण करत थेट निर्यात करणे अधिक सुलभ होणार आहे. कृषी विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या संयुक्त पुढाकारामुळे रत्नागिरीच्या जगप्रसिद्ध हापूस आंब्याच्या निर्यातीला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





