मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयानंतर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला असून, आजअखेर सुमारे ५१ लाख नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी जवळपास २५ लाख कार्डे कार्यान्वित करण्यात आली असून उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता नोंदणी व सक्रियकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने राज्यभरात ४ हजारांहून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. दरम्यान, स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसल्याचा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा जादा रक्कम आकारून कार्डांची विक्री करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा परवाना तत्काळ रद्द केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक व्हावी, या उद्देशाने ही प्रणाली राबविण्यात येत आहे. राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







