पिंपरी : वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग, सिग्नल बिघाड किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन यांसारख्या समस्यांची तक्रार करण्यासाठी आता नागरिकांना पोलीस ठाणे किंवा वाहतूक शाखेच्या कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरू केलेला ‘ट्रॅफिक बडी’ हा व्हॉट्सॲप चॅटबॉट नागरिकांसाठी प्रभावी माध्यम ठरत असून मे महिन्यात प्राप्त झालेल्या तब्बल १,३६५ तक्रारींचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे. शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे वाहतूक व्यवस्थेवरील ताण वाढत असताना नागरिकांच्या सहभागातून व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला पोलीस सहआयुक्त शशीकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तक्रार नोंदविण्याची सोपी प्रक्रिया आणि त्वरित प्रतिसाद हे ‘ट्रॅफिक बडी’चे प्रमुख वैशिष्ट्य मानले जात आहे.
या चॅटबॉटच्या माध्यमातून वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग, खराब रस्ते, ट्रॅफिक सिग्नलमधील बिघाड, अवजड वाहनांकडून होणारे नियमभंग तसेच वाहतूक सुधारणा संदर्भातील सूचना अशा विविध प्रकारच्या तक्रारी फोटोसह थेट नोंदविता येतात. प्राप्त झालेल्या तक्रारींवर २४ तासांच्या आत कारवाई केली जाते आणि त्यानंतर संबंधित तक्रारदाराला मोबाईलवर निवारणाचा अहवाल पाठविला जातो. त्यामुळे तक्रार प्रक्रियेत पारदर्शकता वाढून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ तक्रारींपुरता मर्यादित नसून नागरिकांना वाहतूक व्यवस्थापनात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक समस्या सोडविण्याचा हा अभिनव प्रयोग यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी नागरिकांना ८७८८६४९८८५ या ‘ट्रॅफिक बडी’ व्हॉट्सॲप क्रमांकाचा अधिकाधिक वापर करून वाहतूक व्यवस्थापनात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.






