पुणे : शहरावर वाढत्या पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना पुणे महानगरपालिकेने १५ जून २०२६ पासून संपूर्ण शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात झालेली मोठी घट आणि मान्सूनचे आगमन लांबल्याने उपलब्ध पाणी जास्तीत जास्त काळ पुरविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या नव्या नियोजनानुसार, सध्याचा पाणीसाठा २० ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी पाणीवाटपावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. खडकवासला धरण साखळीत सध्या केवळ ५.८७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून त्यापैकी प्रत्यक्ष वापरण्यायोग्य साठा सुमारे ३ टीएमसी इतकाच असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पुणे शहराला दरमहा सरासरी १.६० टीएमसी पाण्याची आवश्यकता भासत असल्याने पाणी बचतीसाठी हा उपाय आवश्यक असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. महापौर मंजूषा नागपुरे आणि महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी अनेक व्यावसायिक वापरांवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील सर्व कार वॉशिंग सेंटर्स आणि स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नवीन बांधकामे, उद्याने, लॉन्स आणि इतर बिगर-आवश्यक कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधून (एसटीपी) तयार होणाऱ्या पुनर्वापरयोग्य पाण्याचा वापर वाढविण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या अंदाजानुसार, एक दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयामुळे दरमहा सुमारे २५ टक्के पाण्याची बचत होऊ शकते, ज्यामुळे जुलै आणि ऑगस्टपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे शक्य होणार आहे. या संदर्भातील अधिकृत परिपत्रक आणि प्रत्येक भागाचे सविस्तर वेळापत्रक पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा नियोजनाची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिकेने शहरातील जलकुंभ (टाक्या) आणि संबंधित परिसरांचे दोन भागांत (सम आणि विषम तारखांनुसार) विभाजन केले आहे. नागरिकांना त्यांच्या नेहमीच्याच वेळेत पाणी मिळणार असले, तरी ते एका दिवसाआड येईल.
‘सम‘ तारखांना (उदा. १६, १८, २० जून) पाणी मिळणारे मुख्य भाग:
शिवाजीनगर, डेक्कन, प्रभात रोड, आपटे रोड, एरंडवणे, मॉडेल कॉलनी, गोखलेनगर, औंध, बाणेर (बाणेर गावठाण, वीरभद्र नगर, गणराज चौक), बालेवाडी, पाषाण, सुस रोड, म्हाळुंगे, वारजे, शिवणे, कोथरूडचा काही भाग, तसेच जुन्या पेठांचा काही भाग.
‘विषम‘ तारखांना (उदा. १५, १७, १९ जून) पाणी मिळणारे मुख्य भाग:
धानोरी, येरवडा, कोरेगाव पार्क, बी. टी. कवडे रोड, घोरपडी, हडपसर, कोंढवा, कात्रज, धनकवडी, तळजाई, दत्तवाडी, आणि खडकी कॅन्टोन्मेंटचा उर्वरित भाग.







