पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाकडून पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणातील दोन महिला आरोपींना उमेदवारी देण्यात आली आहे. कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या आरोपी सोनाली कोमकर आणि लक्ष्मी कोमकर यांना पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २३ मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकीटावरून निवडणूक लढवणार आहेत. या दोघीही तुरुंगांतून निवडणूक लढवणार आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यापूर्वी गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे हिलादेखील उमेदवारी जाहीर केली होती. त्यानतंर आता पुण्यातील गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोघांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुणे गुन्हेगारीमुक्त करण्याचे आश्वासन देणाऱ्या अजित पवारांवर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्नही यावरून उपस्थित होत आहे. दरम्यान, बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आदेकर यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. यानंतर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यंनी २७ डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे आंदेकर यांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे.







