पुणे : पानशेत रस्त्यावरील खानापूरमधील एका सराफी पेढीवर दरोडा टाकून सव्वा कोटीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ग्रामीाण पोलिसांनी ४८ तासात गुन्हा उघडकीस आणला. चोरट्यांकडून ७० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले. अंकुश दगडू कचरे (वय २०) गणेश भांबु कचरे (वय २३, रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींबरोबर असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली. २६ डिसेंबर रोजी पानशेत रस्त्यावरील खानापूर गावात असलेल्या एका सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा घालण्यात आला होता. चोरट्यांनी कोयता आणि तलवारीच्या धाकाने ऐवज लुटला होता.
पसार झालेल्या चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपास पथकाने तपास सुरू केला. चोरट्यांना पकडण्यासाठी हवेली आणि ग्रामीाण पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपींची ओळख पटली. पसार झालेले चोरटे पानशेत परिसरातून दुचाकीवरुन राजगड (वेल्हे) तालुक्यात गेल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलीस मागावर असल्याचे समजताच आरोपी कचरे आणि अल्पवयीन साथीदार पळाले. दुचाकी रस्त्यात सोडून दिली आणि चोरट्यांनी नदीत उडी मारली. त्यानंतर पोलीस कर्मचारी गणेश धनवे आणि सागर नामदास यांनी नदीत उडी मारली. धनवे हे नदीच्या पलीकडच्या काठावर जाऊन थांबले. चोरटा अंकुश कचरे याची पोहताना दमछाक झाली. कचरे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कचरे याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून काेयते, तलवारी, दुचाकी, तसेच ७० लाख ३२ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक वैशाली पाटील, सहायक निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, किशोर शेवते, महादेव शेलार, उपनिरीक्षक हनुमंतर पासलकर, शीतल ठेंबे, संजय सुतनासे, सुभाष गिरे, दिलीप शिंदे, रामदास बाबर, अमाेल शेडगे, मंगेश थिगळे, मंगेश भगत, तुषार भोईटे, गणेश धनवे, सागर नामदास आणि पथकाने ही कामगिरी केली.







