पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक नियमांना चकवा देण्यासाठी कारच्या नंबर प्लेटवर बटण दाबताच काळे आवरण येऊन नोंदणी क्रमांक पूर्णपणे लपवणारी ‘मोटराइज्ड’ यंत्रणा बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ताथवडे येथील एका कार चालकाविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाई करत संबंधित वाहनावरील बेकायदेशीर यंत्रणा हटवली आणि ₹४,५०० दंडही वसूल केला. पोलीस हवालदार रोहिदास बोऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरटीओची कोणतीही परवानगी न घेता ही यंत्रणा बसवण्यात आली होती. महामार्गावरील वेग मोजणारे कॅमेरे, ई-चलान प्रणाली, नाकाबंदी तसेच अन्य कायदेशीर कारवाईपासून बचाव करण्यासाठी ही यंत्रणा वापरली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले. प्राथमिक तपासानुसार, कारमध्ये बसवलेल्या ‘पुश-बटण’ प्रणालीद्वारे नंबर प्लेटवर काळे आवरण खाली येत असे आणि वाहनाचा नोंदणी क्रमांक पूर्णपणे झाकला जात होता. त्यामुळे वाहनाची ओळख पटवणे कठीण होत होते. अधिकाऱ्यांनी नमूद केले की, अशी यंत्रणा केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन लपवण्यासाठीच नव्हे, तर अपघात, गंभीर गुन्हे किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांनंतर वाहनाचा माग काढणे कठीण व्हावे, या उद्देशानेही वापरली जाऊ शकते. त्यामुळे हा प्रकार अत्यंत गंभीर मानून शासनाची फसवणूक तसेच कायद्याला चकवा देण्याचा प्रयत्न म्हणून त्याची नोंद घेण्यात आली आहे.
हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे उघडकीस आला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर धावत असलेल्या कारची नंबर प्लेट बटणाद्वारे झाकली जात असल्याचे दृश्य व्हायरल झाल्यानंतर परिवहन विभागाने तत्काळ तपास सुरू केला. वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे मालकाचा शोध घेण्यात आला आणि त्याच्या कायमस्वरूपी पत्त्यावर जाऊन कारची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान नंबर प्लेट लपवण्यासाठी बसवलेली विशेष ‘मोटराइज्ड’ यंत्रणा आढळून आली. अधिकाऱ्यांनी ती जागेवरच काढून टाकत मोटार वाहन अधिनियमांतर्गत कारवाई केली. पिंपरी-चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी सांगितले की, टोल नाक्यावर वाहनाचा क्रमांक स्पष्ट दिसत असला तरी महामार्गावर प्रवेश केल्यानंतर तो जाणीवपूर्वक लपवला जात होता. ही कृती ई-चलान, वेगमर्यादा उल्लंघन आणि इतर वाहतूक नियमांवरील कारवाई टाळण्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत. या कारवाईनंतर वाहतूक नियमांना चकवा देण्यासाठी अशा प्रकारच्या बेकायदेशीर यंत्रणांचा वापर करणाऱ्यांवर प्रशासनाकडून अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






