वसई : वसई विरार शहरात प्रवाशांच्या आर्थिक लुटीला चाप बसावा यासाठी येत्या १५ नोव्हेंबर पासून मीटर रिक्षा धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र रिक्षा चालकांना निर्माण होत असलेल्या विविध अडचणींमुळे या अंमलबजावणीला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक रिक्षाने प्रवास करतात. गेल्या काही काळात वाढत्या लोकसंख्येसह शहरातील रिक्षांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तर रिक्षाचे परवाने खुले झाल्यापासून रिक्षाचालकांच्या संख्येत अजूनच भर पडली आहे.
पण याचबरोबर रिक्षाचालकांकडून केल्या जाणाऱ्या मुजोरीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. तर अतिरिक्त भाडे आकारणे, प्रवाशांसोबत गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे अशा समस्यांनाही नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि भाड्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मीटर रिक्षा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या मागणीनुसार परिवहन विभागाने येत्या १५ नोव्हेंबरपासून मीटर रिक्षा सुरू करण्यात येतील अशी घोषणा केली होती. मात्र हा निर्णय लागू होण्याआधी रिक्षा चालक व मालक यांना निर्माण होणाऱ्या समस्या ही समजून घेणे आवश्यक आहे. रिक्षाचालकांनी मीटरच्या संदर्भात विविध समस्या मांडल्या यात प्रामुख्याने विनापरवाना रिक्षा चालविणारे चालक, रस्त्यांची झालेली दुरावस्था, अपुरे सीएनजी पंप, मीटर रिकेलिब्रेशमध्ये येत असलेल्या अडचणी, प्रवासी व रिक्षाचालक यांच्यात जनजागृतीचा अभाव या समस्यांचा समावेश होता.रिक्षा चालकांच्या समस्यांचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनीही सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.







