मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी शिक्षकांसाठी सक्तीची करण्यात आली आहे. या टीईटी सक्तीविरोधात राज्यभरातील शाळा २४ नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. या निर्णयाचा फटका राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसणार आहे. राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या संयुक्त पुढाकाराने नुकतीच रावसाहेब पटवर्धन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुणे येथे राज्यभरातील शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नांवर विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा.
दोन आठवड्याच्या आत याबाबत कार्यवाही झाली नाही. तर २४ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक शाळा बंद आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना व महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना यांनी मंगळवारी दिला. दरम्यान, आंदोलनानंतरही पुनर्विचार याचिका दाखल झाली नाही, तर संघटना थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून शिक्षकांना लक्ष्य केले जात आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, चुकीचे संदर्भ लावून शिक्षकांवर कारवाया करण्यात येत आहे, असा आरोप शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी केला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने याबाबत त्वरित हस्तक्षेप करावा, अन्यथा शिक्षक रस्त्यावर उतरून २४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात शाळा बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक समितीकडून देण्यात आला.







