वसई : जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला असला तरी वसई-विरार परिसरात अद्याप समाधानकारक पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे एकीकडे उष्णता आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे पावसाळी साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होत असल्याने या काळात छत्र्या, रेनकोट, पावसाळी चपला आणि इतर साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र यंदा पावसाने दडी मारल्यामुळे ग्राहकांकडून केवळ चौकशी होत असून प्रत्यक्ष खरेदी अत्यंत मंदावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून काहीसा उशिरा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केल्याने नागरिकांमध्येही पावसाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव परिसरातील बाजारपेठांमध्ये सजवण्यात आलेल्या पावसाळी साहित्याच्या दुकानांमध्ये अपेक्षित वर्दळ दिसून येत नाही. अनेक विक्रेत्यांनी पावसाळी हंगाम लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर मालसाठा करून ठेवला आहे. मात्र पावसाच्या अनुपस्थितीमुळे तो माल विक्रीविना पडून राहिल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
यंदा पावसाळी साहित्याच्या किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. साधी काळी छत्री १५० ते २०० रुपयांपर्यंत विकली जात असून लहान मुलांसाठीच्या फॅन्सी आणि थ्री-फोल्ड छत्र्यांची किंमत २५० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच पीव्हीसी आणि पॉलिस्टरचे रेनकोट ५०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहेत. दुचाकी चालक आणि नोकरदारांसाठी असलेले प्रीमियम व ब्रँडेड रेनकोट १५०० ते ४००० रुपयांहून अधिक किमतीत विकले जात आहेत. वाढत्या किमतींमुळे ग्राहक खरेदी करण्याऐवजी थांबून परिस्थितीचा अंदाज घेत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. वसई-विरारमधील अनेक व्यापारी वर्षभर इतर वस्तूंचा व्यवसाय करत असले तरी पावसाळ्यात अतिरिक्त उत्पन्नासाठी छत्री आणि रेनकोट विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र यंदा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक विक्रेते रमेश चौरसिया यांनी सांगितले की, ग्राहक दुकानात येऊन दर विचारतात, विविध प्रकारच्या वस्तू पाहतात; मात्र खरेदी करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पावसाचे आगमन लांबत गेल्यास हंगामी व्यवसायावर त्याचा आणखी गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून व्यापारी आता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत.







