मुंबई : मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (भायखळा झू) येथे उभारण्यात येत असलेले अत्याधुनिक टनेल ॲक्वेरियम (बोगद्यातील मत्स्यालय) जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. गुरुवारी १७ सप्टेंबर २०२६ रोजी प्राणिसंग्रहालयाला भेट देत त्यांनी विविध विकासकामांची पाहणी केली आणि मत्स्यालयाचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांना या आधुनिक मत्स्यालयाचा आनंद घेता येणार आहे. पेग्विन कक्षाजवळ उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे ₹७० कोटींचा खर्च करण्यात येत असून, येथे घुमटाकार मत्स्यालय, पदभ्रमणासाठी टनेल ॲक्वेरियम, पॉप-अप विंडो तसेच विविध आकारांच्या अॅक्रिलिक टाक्यांमध्ये समुद्री आणि गोड्या पाण्यातील विविध जलचर प्रदर्शित केले जाणार आहेत. नैसर्गिक समुद्री वातावरणाची अनुभूती देण्यासाठी कृत्रिम रॉकवर्कचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रकल्पात ४ आयताकृती, ५ वर्तुळाकार आणि २ अर्धगोलाकार मत्स्य टाक्या उभारल्या जाणार असून पर्यटकांना जलचर जीवनाचा अनोखा अनुभव मिळणार आहे.
या मत्स्यालयातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे १४ मीटर लांबीचा कोरल फिश टनेल आणि ३६ मीटर लांबीचा डीप ओशन टनेल, ज्यातून चालत जाताना पर्यटकांना चारही बाजूंनी पोहत असलेले विविध प्रकारचे मासे आणि जलचर जवळून पाहता येतील. याशिवाय, ३६० अंशांत जलचरांचे दर्शन घडवणारी पॉप-अप विंडो देखील तयार करण्यात येणार असून, एका वेळी तीन जणांना या सुविधेचा लाभ घेता येईल. विशेषतः मुलांसाठी हा अनुभव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. प्रवेशद्वारावर उभारण्यात येणारे घुमटाकार मत्स्यालय पर्यटकांचे स्वागत करणार असून, त्यातून जलचरांच्या रंगीबेरंगी जगाची पहिली झलक पाहायला मिळेल. दरम्यान, आयुक्त आश्विनी भिडे यांनी उद्यानातील जास्वंद प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रदर्शनात सुमारे ५० विविध रंगांच्या जास्वंद प्रजाती नागरिकांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या असून त्याला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ‘एक पेड माँ के नाम’ अभियान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यानात ‘सेंच्युरी पाम’ वृक्षाची लागवडही करण्यात आली. आधुनिक सुविधा, जलचर संवर्धन आणि पर्यटनाला चालना देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भायखळा प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण आणखी वाढणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





