मुंबई : मुंबईत कमी अंतराच्या प्रवासासाठी रिक्षाचालकांकडून सर्रास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांना पर्याय म्हणून ॲप-आधारित रिक्षा सेवा वापरावी लागत आहे. मात्र, अशा सेवांमधून कमी अंतराच्या प्रवासासाठीही अधिक भाडे आकारले जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने रॅपिडो कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येणार आहे. गोरेगाव येथील प्रवासी कृष्णा एन. सिंग यांनी हा प्रकार उघडकीस आणला. गोरेगाव रेल्वे स्थानकावरून ओबेरॉय मॉलपर्यंत जाण्यासाठी त्यांनी अनेक रिक्षाचालकांना मीटरप्रमाणे येण्याची विनंती केली, मात्र बहुतांश चालकांनी प्रवासास नकार दिला. त्यानंतर त्यांनी रॅपिडोद्वारे रिक्षा बुक केली असता त्यांना ₹७६ भाडे दाखविण्यात आले. त्याच अंतरासाठी मीटरनुसार साधारण ₹४० भाडे आकारले गेले असते. अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी प्रवाशांकडून प्राप्त झाल्यानंतर परिवहन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित कंपनीकडून स्पष्टीकरण मागवून नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची चौकशी केली जाणार असल्याचे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
रिक्षाचालकांकडून कमी अंतराच्या प्रवासास सातत्याने नकार दिला जात असल्यामुळे प्रवाशांना अप्रत्यक्षपणे ॲप-आधारित एग्रीगेटर सेवांकडे वळावे लागत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अनेकदा जवळच्या अंतरासाठी रिक्षा न मिळाल्याने प्रवाशांकडे अधिक भाडे देऊन ऑनलाइन बुकिंग करण्याशिवाय पर्याय राहत नाही. दरम्यान, सप्टेंबर २०२६ मध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ग्राहकांवर अधिक पैसे देण्यासाठी मानसिक दबाव टाकणारे ‘डार्क पॅटर्न’ वापरल्याप्रकरणी रॅपिडोवर ₹१० लाखांचा दंड ठोठावला होता. ॲपमध्ये ‘जास्त पैसे द्या आणि लवकर राइड मिळवा’ अशा संदेशांद्वारे ग्राहकांकडून वाढीव भाडे आकारले जात असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. दुसरीकडे, मुंबईत बेकायदेशीर बाईक-टॅक्सी सेवाही सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक ठिकाणी खासगी वापरासाठी असलेल्या पांढऱ्या क्रमांकाच्या मोटारसायकलींवर प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक प्रकरणांमध्ये मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना हेल्मेट दिले जात नसल्यामुळे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नियमांनुसार बाईक-टॅक्सी सेवांसाठी आवश्यक अटींचे पालन होत आहे का, याचीही संबंधित यंत्रणांकडून तपासणी सुरू असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसह योग्य भाडे आकारणी सुनिश्चित करण्यासाठी पुढील कारवाई केली जाणार आहे.






