मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात यंदाच्या गणेशोत्सवाच्या पहिल्याच तीन दिवसांत भक्तांनी कोट्यवधी रुपयांचे दान अर्पण केले आहे. १४ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या उत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत मंडळाला ₹१ कोटी ९० लाखांची रोख रक्कम, ६४७.४७ ग्रॅम सोने आणि १२,३८९ ग्रॅम (सुमारे १२.३९ किलो) चांदी दान स्वरूपात प्राप्त झाली आहे. मंडळाच्या व्यवस्थापन समितीच्या माहितीनुसार, या सर्व दानाची एकूण किंमत सुमारे ₹३ कोटी १८ लाख इतकी आहे. दानपेट्या दररोज पूजा विधी पूर्ण झाल्यानंतर उघडल्या जातात. पहिल्या दिवशी मंडळाला ₹४८ लाख रोख, ६६.७७ ग्रॅम सोने आणि २,८०६ ग्रॅम चांदी मिळाली. त्यानंतर १६ सप्टेंबरला ₹८८.९० लाख रोख, २२६.१२ ग्रॅम सोने आणि ५,५१६ ग्रॅम चांदी, तर १७ सप्टेंबरला ₹५३ लाख रोख, ३५४.५८ ग्रॅम सोने आणि ४,०६७ ग्रॅम चांदी दान म्हणून अर्पण करण्यात आली. रोख रकमेसोबत भक्तांनी सोन्याच्या बांगड्या, चेन, चांदीची पेन तसेच चांदीवर नक्षीकाम केलेल्या क्रिकेट बॅट्ससारख्या मौल्यवान वस्तूही अर्पण केल्या आहेत.
दानपेट्या उघडल्यानंतर मिळालेल्या रकमेची आणि मौल्यवान वस्तूंची तपासणी मुंबई महानगरपालिका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि लालबागचा राजा ट्रस्ट यांच्या प्रतिनिधींच्या संयुक्त पथकाकडून केली जाते. त्यानंतर सर्व रक्कम बँकेत जमा करण्यात येते आणि ट्रस्टतर्फे वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांसाठी तिचा वापर केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असून, देशभरातील श्रद्धाळूंसह बॉलिवूड कलाकार, उद्योगपती आणि राजकीय नेतेही बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. यंदाच्या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबासह दर्शन घेतले, तर अंबानी कुटुंबीय, अभिनेता शाहरुख खान, त्याचा मुलगा अबराम आणि अभिनेता रणवीर सिंह यांनीही बाप्पाचे दर्शन घेतले. १४ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा दहा दिवसांचा गणेशोत्सव २५ सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याने पुढील काही दिवसांत दानपेटीत जमा होणाऱ्या रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






