मुंबई : संपूर्ण मुंबईतील रस्त्यांचे सिंमेट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेविरहीत होतील. वाहतूक कोंडीमुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र शासन, मुंबई पोलीस यांच्यासमवेत मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका एकत्रितपणे काम करीत आहे. मुंबईतील चौपाट्यांवरही स्वच्छता मोहीम राबविली जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईचे माजी नगरपाल (शेरीफ) पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मरिन ड्राईव्ह परिसरात शामलदास गांधी मार्गावरील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाखाली साकारण्यात आलेल्या शिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासन, महानगरपालिका अथक परिश्रम घेत आहे. मात्र, यासोबतच विविध संस्था, संघटना आणि सर्वसामान्य मुंबईकरांनीही या मोहिमेत सहभागी व्हायला हवे. त्यासाठी सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून मुंबईतील प्रदूषण कमी झाले आहे, असा दावा शिंदे यांनी केला.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा काही भाग वाहतुकीसाठी खुला केल्यापासून दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. मुंबईकरांचा वेळ, पैसा आणि इंधनाची बचत होत आहे. मुंबई आपली आहे, तिच्यासाठी काही तरी करायला हवे, या भावनेने आय लव्ह मुंबई आणि जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनसारख्या आणखी काही संघटना एकत्र येतील, तेव्हा मुंबईच्या विकासाचा वेग नक्कीच वाढेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. नागरिकांमध्ये योगबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आय लव्ह मुंबई आणि जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनच्या शायना एन. सी. यांच्या नेतृत्वाखाली शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपुलाखाली विविध योगमुद्रा कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. बाया डिझाईनच्या शिबानी दास गुप्ता यांनी ही शिल्पे साकारली आहेत. मरिन ड्राईव्ह येथे किलाचंद चौकात जागतिक योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरात महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, उप आयुक्त संगीता हसनाळे, सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहाण, सहायक आयुक्त जयदीप मोरे, आय लव्ह मुंबई आणि जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या शायना एन. सी., ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ आदी उपस्थित होते.