मुंबई : शिवसेनेच्या उद्धवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणाशी संबंधित सीडीआर, सीसीटीव्ही फूटेज व अन्य महत्त्वाचे पुरावे सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले. घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी अथवा सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे होती. शुक्रवारच्या सुनावणीत न्यायालयाने घोसाळकरांवर गोळी झाडल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा, त्याचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा आणि आणखी एक संशयित मेहुल पारेख या तिघांचाही कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) व परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
अभिषेक घोसाळकर यांची फेब्रुवारीमध्ये मॉरिस नोरोन्हा याने एका कार्यक्रमात गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्याचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याच्याकडे पिस्तूल होती. त्याच्याच पिस्तूलने मॉरिसने अभिषेकवर गोळ्या झाडल्या. विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.