ठाणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू माती तसेच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेशमूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना ठाणे महानगरपालिकेकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर अशा मूर्तिकारांना मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर जागांचे वाटप करण्यात येणार आहे. आयुक्त सौरभ राव यांनी यासंदर्भातील माहिती देताना इच्छुक मूर्तिकारांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयात १५ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून उपलब्धतेनुसार १५ जुलैपर्यंत जागा तसेच शाडू माती मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, महापालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून शेड, वीज आणि पाणी यांसारख्या सुविधा मूर्तिकारांना स्वतः उभाराव्या लागणार आहेत.
महापालिकेच्या महिला बचत गटांमार्फत तसेच वर्तकनगर येथील हवा प्रदूषण प्रयोगशाळेतून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यावरणपूरक साहित्य किंवा शाडू मातीपासून मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांनी अर्ज करताना आपणच मूर्तिकार असल्याचे हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, अशा मूर्तिकारांना त्यांच्या मंडपाबाहेर “पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध आहेत” असा ३ बाय ५ फूट आकाराचा फलक लावणे आवश्यक राहणार आहे. महापालिकेकडून उपलब्ध करून दिलेली जागा नवरात्रोत्सव संपेपर्यंत वापरण्यासाठी देण्यात येणार असून त्यानंतर ती पुन्हा महापालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे. दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ ते ७ जून २०२६ या कालावधीत हिरानंदानी इस्टेट परिसरातील जैवविविधता उद्यान येथे शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची विशेष कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी केले आहे.







