नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रविवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी सोशल मीडियावर महत्त्वाची पोस्ट शेअर करत काही अटी मान्य झाल्यास आपले आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता केंद्र सरकार या अटींवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रविवारी त्यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनीही माध्यमांशी बोलताना सरकारने या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, जर राजकीय नेत्यांनी सफदरजंग रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि संसदेच्या चालू अधिवेशनात शिक्षणातील उत्तरदायित्व आणि आवश्यक सुधारणा हा मुद्दा प्राधान्याने उपस्थित करण्याचे आश्वासन दिले, तर सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्यास तयार होतील. शिक्षण व्यवस्थेतील जबाबदारी निश्चित करणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारसमोर ठेवलेल्या तीन अटी :
- केंद्र सरकारने नीट परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील जबाबदारी जबाबदारी घ्यावी.
- जर मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ देण्यात आले आणि तेथील खासदारांनी आम्हाला नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले तर मी आमरण उपोषण मागे घ्यायला तयार आहे.
- जर माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आले नाही तर खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात येऊन मला वरील सर्व गोष्टींबाबत आश्वासन द्यावे.
आता केंद्र सरकार आणि राजकीय पक्ष या मागण्यांवर काय निर्णय घेतात, यावर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचे पुढील पाऊल अवलंबून असणार आहे.






