नवी मुंबई : नवी मुंबईत हार्बर मार्गावरील सर्वात गजबजलेले रेल्वे स्थानक म्हणजे सीवूड्स दारावे रेल्वे स्थानक. या स्थानकाचे नाव बदलले असून करावे गावचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर या रेल्वेस्थानकाचे नाव ‘सीवूड्स दारावे-करावे’ असे करण्यात आले आहे. याबाबतचे नाव महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच या स्थानकावर नव्या नावाची पाटी झळकणार आहे.
नवी मुंबईच्या विकासात शहरातील रेल्वे स्थानकाचांही मोठा वाटा आहे. हार्बर मार्गाच्या विस्तारानंतरच येथे झपाट्याने लोकसंख्येत वाढ झाली. बेलापूर व नेरुळ रेल्वेस्थानकाच्या दरम्यान दारावे गावाजवळ रेल्वे फाटक होते. सुरुवातीला सीवूड्स रेल्वेस्थानक होण्यापूर्वी याच स्थानकाच्या नावाला दारावे ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यांनी सिडकोने लावलेल्या फलकाला काळे फासत आंदोलन केले होते. त्यांनतर या स्थानकाचे नाव सीवूड्स दारावे रेल्वेस्थानक झाले होते. त्यानंतर आता २० वर्षानंतर पुन्हा एकदा या स्थानकाच्या नावात बदल होऊन सीवूड्स- दारावे- करावे असे नामकरण करण्यात येणार आहे.







