मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे चैत्यभूमी परिसरात तसेच मुंबईमध्ये येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चैत्यभूमी परिसरात योग्य मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दादर आणि आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचे प्रभावी नियोजन करावे. अनुयायांना मार्गदर्शन मिळावे यासाठी जागोजागी सूचना फलक लावावेत. तसेच नागरिकांच्या सुलभ प्रवासासाठी बेस्टतर्फे अतिरिक्त बस सेवा उपलब्ध ठेवावी. येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था, सुरक्षा, आरोग्य सेवा, भोजन व्यवस्था, चैत्यभूमी परिसरातील वॉटरप्रूफ मंडप, स्वच्छतागृहे, पुष्पवृष्टी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सर्व सुविधांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. चैत्यभूमी येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला ज्ञान दिले, जागरूक केले. त्या जागरूकतेला अधिक बळकटी देण्याचा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.







