नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे अतिक्रमण उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी अतिक्रमण विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर बेकायदा इमारती, मार्जिनल स्पेस, अनधिकृत होर्डिंग यांच्यावर कारवाईचा सपाटा लावला आहे. ३१ मे रोजी नेरूळ विभागात सुरू असणाऱ्या अनधिकृत पब, बारच्या विरोधात उत्पादन शुल्क तसेच पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली.
नेरूळ विभागातील राजमहाल बार, मिनिमहल बार, डायमंड बार, क्रेझी बार, लैला बार, स्टार गोल्ड आणि साई पूजा बार अशा सात पब बार असलेल्या अनधिकृत बाधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनधिकृतपणे सुरू असणारे बार, लेडिज बार, धाबे चालक, पब व्यावसायिक यांचे धाबे दणाणले आहेत. बेकायदा सुरू असणाऱ्या हॉटेल, पब, बार, धाबे यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली असून आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले.