मुंबई: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी दुपारी ३ पर्यंत पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील उत्तर मुंबई, वायव्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या तीन मतदारसंघांची मतमोजणी ही नेस्को सेंटर, गोरेगाव मध्ये होईल. ईशान्य मुंबई मतदारसंघाची मतमोजणी उदयांचल शाळा, विक्रोळी येथे होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली.
सर्व ठिकाणी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार आहे. सुरुवातीला टपाली मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर मतदान यंत्राद्वारे मतमोजणीस सुरुवात होणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करताना त्यातील समाविष्ट विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केली जाईल. यामध्ये प्रत्येकी १४ टेबलवर ही मतमोजणी सुरू होईल. साधारणत: मतमोजणीचे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रानुसार १८ ते २१ राऊंड होतील. सकाळी ११ वाजेपर्यंत कल तर दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल लागेल, असा प्रयत्न आहे. यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी आज शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करून मतमोजणीसाठी आवश्यक उपाययोजना आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला. मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणी पथके, आपत्कालीन कंट्रोल रूमची पाहणी करून चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि अखंडित व सुरळीत वीजपुरवठा राहील या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यादव यांनी दिल्या.