मुंबई : मुंबई महापालिकेने सखोल स्वच्छता मोहीम राबवित दिवसभरात १५७ मेट्रिक टन राडारोडा, २३ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू, ७४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन केले. सखोल स्वच्छतेचा भाग म्हणून २८३ किमी लांबीचे रस्तेही स्वच्छ केले. मुंबईत महापालिकेकडून २८ आठवड्यांपासून स्वच्छता मोहीम सुरू आहे. दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात ही मोहीम अधिक विस्तारित केली जात आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने ए विभागात बोरा बाजार, सर फिरोजशाह मेहता मार्ग, पेरी नरिमन मार्ग, डी विभागात नाना चौक, ताडदेव सर्कल, जावजी दादाजी मार्ग, जी दक्षिणमध्ये धोबीघाट, सुदाम काळू अहिरे मार्ग, जी उत्तरमध्ये शाहूनगर, धारावी, एच पूर्व विभागात सांताक्रूझ येथील इंडियन ऑइल कंपनी प्रवेशद्वार ते हनुमान टेकडी परिसर, के पूर्व विभागात प्रभाग ८३ मधील झोपडपट्टीसह परिसर, के पश्चिम विभागात वेसावेतील मत्स्यपालन विद्यापीठ मार्ग, सुंदरवाडी, एल विभागात साकीनाक्यातील एस. जे. स्टुडिओ ते खैरानी मार्गाचा समावेश होता.
त्यासह एम. पूर्वेतील सोनापूर मार्ग, पी दक्षिणेतील महात्मा गांधी मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, पी उत्तरेतील मालाड पश्चिमेतील जोड रस्ता, आर दक्षिण विभागात कांदिवली पूर्वेतील आकुर्ली मार्ग, आर उत्तर विभागात दहिसर पश्चिम, आर मध्य विभागात अमरकांत झा, ब्रह्मा विष्णू महेश मार्ग, शिंपोली मार्ग, मल्हारराव कुलकर्णी मार्ग, टी विभागातील मुलुंड आदी भागात स्वच्छता करण्यात आली. मुंबईतील २८३ किमी रस्त्यावरील धूळ काढण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत १,३३२ कामगार-कर्मचारी, १९६ संयंत्राचे सहाय्य घेण्यात आले. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन वाहने, पाण्याचे टँकर आदींसह अन्य अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित होती.