मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. मुंबईतील दोन प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ‘ताज हॉटेल’ आणि ‘ट्रायडंट हॉटेल’ला अज्ञात व्यक्तीकडून उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या धमकीनंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या असून संपूर्ण शहरात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यांदरम्यान ही दोन्ही हॉटेल्स दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. त्यामुळे या नव्या धमकीकडे सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत गांभीर्याने पाहिले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षाला आलेल्या एका फोनमध्ये संबंधित व्यक्तीने दोन्ही हॉटेल्सवर लवकरच दहशतवादी हल्ला होणार असल्याचा दावा केला. माहिती मिळताच पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता दोन्ही हॉटेल्सच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली. हॉटेल्सभोवती अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तसेच विशेष सुरक्षा पथकांनी परिसराची सखोल तपासणी सुरू केली.
धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या तांत्रिक पथकाने तातडीने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. प्राथमिक तपासात हा फोन मुंबईतील सायन परिसरातून करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. संबंधित आरोपीला पुढील चौकशीसाठी गुप्त ठिकाणी नेण्यात आले असून, या प्रकरणामागे कोणताही मोठा दहशतवादी कट आहे का याचा तपास सुरू आहे. तसेच आरोपीचे गुन्हेगारी संबंध, त्याची पार्श्वभूमी आणि कोणत्याही संशयित संघटनांशी त्याचा संबंध आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर मुंबईतील रेल्वे स्थानके, मॉल्स, हॉटेल्स आणि इतर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत सतर्क राहण्यास सांगितले आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. मुंबईत शांतता आणि सुरक्षाव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.







