पुणे : महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल साडेतीन महिन्यांनंतर पुन्हा दर्शनासाठी खुले होणार आहे. मंदिरातील मुख्य सभामंडपाची पुनर्बांधणी, सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे तसेच भाविकांसाठी विविध सुविधा विकसित करण्याच्या कामांमुळे जानेवारी महिन्यापासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. आता ही सर्व विकासकामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, ३१ मे २०२६ रोजी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर हे महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली होती. विशेषतः गर्दी व्यवस्थापन, सुरक्षाव्यवस्था आणि प्रवेश-निर्गमन सुलभ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला मंदिर तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचे नियोजन होते, मात्र कामांची व्याप्ती वाढल्याने आणि प्रगतीनुसार मुदत वाढवून ती ३१ मेपर्यंत करण्यात आली.
२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासनाने भाविकांसाठी अधिक सुरक्षित व सुसज्ज व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला आहे. या विकासकामांमध्ये जुना सभामंडप हटवून नव्या भव्य सभामंडपाची उभारणी, पायऱ्यांच्या मार्गाचे सुशोभीकरण, प्रवेश व निर्गमन मार्गांचे विस्तारीकरण, गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक यंत्रणा तसेच भाविकांसाठी विश्रांती क्षेत्रांची निर्मिती यांचा समावेश आहे. पारंपरिक वास्तुशैली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधत हे काम वेगाने पूर्ण केले जात असून, प्रशासनाच्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिर पुन्हा खुले होणार असल्याने उन्हाळी सुट्ट्यांच्या अखेरीस भाविकांना ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, दर्शन पुन्हा सुरू होण्याबाबत भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.







