मुंबई : गणेशोत्सवाच्या इतिहासात यंदा एक अभूतपूर्व आणि नवा अध्याय लिहिला जाणार आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या प्रसिद्ध ‘मुंबईचा राजा’ गणेशोत्सवाने आपल्या २२ फूट उंच गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यंदा प्रथमच पारंपरिक पद्धतीऐवजी विशेष नियोजनाद्वारे क्रेन आणि बार्जच्या मदतीने मूर्तीचे थेट खोल समुद्रात विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातही अशा प्रकारचा हायटेक विसर्जनाचा प्रयोग प्रथमच राबविण्यात येत असल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर मूर्ती पोहोचल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. चौपाटीवर आल्यानंतर विशेष ट्रॉलीवरून २० टन क्षमतेच्या टेलिस्कोपिक हायड्रॉलिक क्रेनच्या साहाय्याने २२ फूट उंच मूर्ती काळजीपूर्वक उचलून ४०० टन वजनाच्या विशाल बार्जवर ठेवली जाईल. त्यानंतर टगबोटच्या मदतीने हा बार्ज खोल समुद्रात नेण्यात येईल. समुद्रात निश्चित केलेल्या ठिकाणी पुन्हा क्रेनच्या साहाय्याने सुमारे २ ते २.५ टन वजनाच्या गणेशमूर्तीचे पूर्ण शास्त्रोक्त आणि विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित, नियोजनबद्ध आणि भाविकांच्या श्रद्धेचा पूर्ण सन्मान राखून पार पाडली जाणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या नव्या उपक्रमामागे भाविकांच्या भावना जपण्याचा आणि विसर्जन प्रक्रियेला अधिक सन्मानजनक स्वरूप देण्याचा उद्देश असल्याचे मंडळाने सांगितले आहे. अनेकदा विसर्जनानंतर मोठ्या मूर्तींचे काही अवशेष समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावर परत येतात. अशा घटना घडल्यास भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. ही बाब लक्षात घेऊन बाप्पाला निरोप देताना अधिक सन्मानपूर्वक, शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने विसर्जन व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी सांगितले की, मंडळाच्या ९९ व्या वर्षानिमित्त हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना धार्मिक परंपरा आणि शास्त्रोक्त विधी यांना तितकेच महत्त्व दिले जाणार आहे. मंडळाचे सहाय्यक खजिनदार संदीप सावंत यांनीही या उपक्रमासाठी सर्व तांत्रिक बाबी, सुरक्षेची उपाययोजना आणि आवश्यक परवानग्यांचे काटेकोर नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली. ‘भव्यतेची परंपरा, संस्कृतीची जोपासना’ आणि ‘इतिहास घडवतो, हक्काने मिरवतो’ या मंडळाच्या ब्रीदवाक्याला साजेसा हा उपक्रम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्रद्धा, परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवणारा हा उपक्रम यंदाच्या गणेशोत्सवातील सर्वात चर्चेचा आणि ऐतिहासिक क्षण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






