नागपूर : मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात वीज वितरण करणाऱ्या महावितरणने डिजिटल सेवांच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत वीज ग्राहकांसाठी ‘व्हॉट्सॲप सेवा’ सुरू केली आहे. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना वीजबिल पाहणे, ऑनलाइन भरणा करणे, तक्रारी नोंदवणे तसेच नवीन वीज जोडणी अर्जाचा मागोवा घेणे यांसारख्या सेवा आता थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महावितरणच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. राज्यातील सुमारे ३ कोटी १२ लाख ग्राहकांसाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली असून, नागपूर परिमंडळातील जवळपास १९ लाख ग्राहकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. डिजिटल व्यवहार आणि व्हॉट्सॲपच्या वाढत्या वापराचा विचार करून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या सेवेमुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार असून व्यवहार अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहेत. महावितरणकडून या सेवेच्या अधिकृत उद्घाटनासाठी तयारी सुरू असून मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या व्हॉट्सॲप सेवेद्वारे ग्राहकांना चालू महिन्याचे वीजबिल पाहता येणार असून डेबिट कार्ड, यूपीआय किंवा इतर डिजिटल माध्यमांतून तत्काळ बिल भरता येणार आहे. देयक भरल्यानंतर पावतीही त्वरित उपलब्ध होणार आहे. ‘गो-ग्रीन’ उपक्रमाला चालना देण्यासाठी ई-बिल डाउनलोड करण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होणे, चुकीचे बिल, मीटरसंबंधी अडचणी किंवा इतर तक्रारी ग्राहकांना थेट व्हॉट्सॲपवर नोंदवता येणार असून त्या तक्रारींची स्थितीही तपासता येईल. अनेक ग्राहकांकडून वीजबिल वेळेवर न मिळाल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याने आता सर्व माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पेपरलेस व्यवहाराला प्रोत्साहन मिळण्यासोबतच पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महावितरणच्या ऑनलाईन सेवांमध्ये यापूर्वीच वीजबिल भरणा, नवीन जोडणी अर्ज, मीटर रीडिंग सादर करणे, बिल इतिहास पाहणे, लोड बदल अर्ज, नाव बदल तसेच वीज खंडित माहिती अशा विविध सुविधा मोबाईल अॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आता व्हॉट्सॲप सेवा सुरू झाल्याने ग्राहकांना या सर्व सुविधा आणखी सहज आणि जलद पद्धतीने वापरता येणार आहेत.







