मुंबई : मुंबईच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला तब्बल पाच वर्षांनंतर मोठी चालना मिळणार असून कॉरडेलिया क्रूझच्या ताफ्यातील अत्याधुनिक ‘कॉरडेलिया स्काय’ हे दुसरे आलिशान जहाज २३ ऑक्टोबर २०२६ पासून मुंबईहून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय समुद्री पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे. २०२१ मध्ये ‘एम्प्रेस’ या जहाजाद्वारे मुंबईहून क्रूझ सेवा सुरू झाली होती आणि १६ सप्टेंबर २०२१ रोजी या जहाजाने पहिला प्रवास केला होता. आता पाच वर्षांनंतर ‘कॉरडेलिया स्काय’च्या आगमनामुळे प्रवाशांसाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. या जहाजातून दोन रात्रींची वीकेंड क्रूझ, तीन रात्रींची गोवा क्रूझ, चार रात्रींची लक्षद्वीप क्रूझ तसेच गोवा आणि लक्षद्वीपचा समावेश असलेली पाच रात्रींची विशेष समुद्री सफर करता येणार आहे. पुढील टप्प्यात चेन्नईहून आग्नेय आशियासाठी सात रात्रींच्या क्रूझचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये फुकेत, लंगकावी, क्वालालंपूर आणि सिंगापूर या लोकप्रिय पर्यटनस्थळांचा समावेश असेल. त्यामुळे भारतीय पर्यटकांना देशांतर्गत पर्यटनासोबतच आंतरराष्ट्रीय समुद्री प्रवासाचाही आकर्षक पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच २०२७ मध्ये ‘कॉरडेलिया सन’ हे आणखी एक जहाज ताफ्यात दाखल करण्याचेही नियोजन कंपनीने केले आहे.
‘कॉरडेलिया स्काय’ हे जहाज २५८ मीटर लांबीचे असून त्याचे वजन सुमारे ७७ हजार १०४ ग्रॉस टन आहे. दोन प्रवाशांच्या ऑक्युपन्सीनुसार या जहाजावर एकावेळी तब्बल २,००४ प्रवाशांचा प्रवास शक्य होणार आहे. जहाजात एक हजार दोन स्टेटरूम्स असून प्रवाशांच्या आरामदायी आणि आलिशान प्रवासासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दहा डायनिंग व्हेन्यूज, अकरा बार आणि लाउंज, दोन जलतरण तलाव, पाच हॉट टब तसेच विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या सुविधा जहाजावर असतील. पिकलबॉल, सी क्रिकेट, गेमिंग झोन, फिटनेस सेंटर आणि जलक्रीडा यांसारख्या उपक्रमांसोबतच लाइव्ह संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध मनोरंजनात्मक शोचे आयोजनही करण्यात येणार आहे. खाद्यप्रेमींसाठी भारतीय प्रादेशिक पदार्थांसह सुशी, इटालियन आणि इतर आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे पर्याय उपलब्ध असतील. आधुनिक सुविधा, आलिशान निवास, उत्कृष्ट खाद्यसंस्कृती आणि देश-विदेशातील आकर्षक पर्यटनस्थळांचा अनुभव यामुळे ‘कॉरडेलिया स्काय’ मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला नवी दिशा देणारे महत्त्वाचे आकर्षण ठरणार असल्याचे मानले जात आहे.






