मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संगम घडवून आणणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद २०२६’ या उपक्रमाला मुंबई उपनगरात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेश दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचा विचार करून सार्वजनिक गणेश मंडपांचे रूपांतर शासनाच्या लोककल्याणकारी योजना, सेवा आणि सुविधांच्या माहिती केंद्रांमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना गणेश दर्शनासोबतच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे. या उपक्रमात केवळ योजनांची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता, संबंधित योजनेसाठी पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, संबंधित शासकीय कार्यालय आणि लाभ मिळविण्याची पद्धत याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील माहितीची दरी कमी करण्यास मदत होत असून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. युवक, विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती देतानाच रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
‘लोकसंवाद २०२६’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासोबत समाजकल्याण, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता तसेच महसूल विभागाने समन्वयाने सहभाग नोंदविला. विभागीय संपर्क अधिकारी ब्रिजकिशोर झंवर आणि संजय ओरके यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देत उपक्रमाचे समन्वयन केले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी घोषिता गोसावी, समाजकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी नंदना गजभिये, तालुका समन्वयक आनंदा कांबळे, समतादूत सिद्धार्थ शिरसाट तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा समन्वयक परेश अपंडकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून योजनांबाबत मार्गदर्शन केले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे यांच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. इंदिरानगरचा राजा – महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आशापुरा, शास्त्रीनगरचा राजा – शास्त्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच शासकीय वसाहत सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यांसह अनेक मंडळांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. गणेशोत्सवातील भक्तीमय वातावरणाचा सकारात्मक उपयोग करून शासनाच्या लोककल्याणकारी योजना, सेवा आणि सुविधांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून ‘लोकसंवाद २०२६’ पुढे येत असून, गणेश मंडप संवाद, मार्गदर्शन आणि जनजागृतीची महत्त्वाची केंद्रे बनत आहेत.





