वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या पुरुष टी-२० संघ क्रमवारीत भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया २७५ रेटिंग पॉईंट्ससह जगातील अव्वल टी-२० संघ ठरली आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या या अपडेटमध्ये भारताने पुन्हा एकदा आपल्या सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीची छाप उमटवली आहे. भारताची आघाडी काहीशी कमी झाली असली तरी दुसऱ्या क्रमांकावरील इंग्लंडपेक्षा भारतीय संघ अजूनही मोठ्या फरकाने पुढे आहे. इंग्लंडकडे २६२ रेटिंग पॉईंट्स आहेत, तर ऑस्ट्रेलिया २५८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. गेल्या काही वर्षांत भारताने टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला असून, २०२४ आणि २०२६ मधील विश्वविजेतेपदामुळे भारतीय संघाची ताकद अधिक अधोरेखित झाली आहे. याच यशामुळे क्रिकेटच्या सर्वात लहान आणि वेगवान फॉरमॅटमध्ये भारताने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे.
आयसीसीने या क्रमवारीसाठी मे २०२५ नंतर खेळल्या गेलेल्या सामन्यांना १०० टक्के वेटेज दिले असून मागील दोन वर्षांतील सामन्यांना ५० टक्के महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे अलीकडील सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघांना मोठा फायदा झाला आहे. पहिल्या सात संघांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नसून न्यूझीलंड २४७ गुणांसह चौथ्या, दक्षिण आफ्रिका २४४ गुणांसह पाचव्या आणि पाकिस्तान २४० गुणांसह सहाव्या स्थानावर कायम आहे. वेस्ट इंडिज २३३ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. यानंतर बांगलादेशने एका रेटिंग पॉईंटची वाढ मिळवत आठव्या स्थानावर झेप घेतली आहे, तर श्रीलंकेला सहा गुणांचे नुकसान झाल्याने त्यांची नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. अफगाणिस्तान दहाव्या स्थानी असून श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आता केवळ एका गुणाचा फरक राहिला आहे. या क्रमवारीत संयुक्त राज्य अमेरिका (USA) हा सर्वाधिक प्रगती करणारा संघ ठरला असून सहा रेटिंग गुणांच्या वाढीसह त्यांनी दोन स्थानांची सुधारणा करत १३ वे स्थान पटकावले आहे. त्यांनी नेदरलँड्स आणि स्कॉटलंडला मागे टाकले आहे. नेपाळ आणि ओमान यांनीही प्रत्येकी एक स्थानाची सुधारणा केली आहे. तर तळातील संघांमध्ये इटलीने सर्वाधिक ११ रेटिंग गुणांची वाढ करत २३ वे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, मोझांबिकला मोठा फटका बसत त्यांची तब्बल १५ स्थानांनी घसरण झाली आहे.







