मुंबई : मुंबई महानगरातील कोकणवासी होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. एसटीची होळी जादा वाहतूक गुरुवारपासून सुरू झाली. मुंबई विभागातून ७८, तर ठाण्यातून ९१ जादा एसटीचे आरक्षण फुल्ल झाले. गणेशोत्सवापाठोपाठ होळीचा सण देखील मुंबईस्थित कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागातून अनेक जण आपल्या कुटुंबासह होळीचा सण साजरा करण्यासाठी मूळ गावी कोकणात जातात. इतर वाहतूक सुविधांपेक्षा नागरिकांना एसटी अधिक जवळची वाटते. कारण ती त्यांना थेट त्यांच्या वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे ग्रुप बुकिंगकडे जास्त ओढा असतो.
होळीकरिता जादा गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण या भागात जादा एसटी धावणार आहेत. या गाड्या नियमित फेऱ्याव्यतिरिक्त आहेत. मुंबईतील ७८ पैकी ३९ बसचे समुह आरक्षण झाले आहे. होळीकरिता मध्य रेल्वेने स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. याशिवाय कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्या देखील धावत आहेत. नियमित गाड्यांचे तिकिट फुल्ल झाल्याने चाकरमान्यांना स्पेशल गाड्यांवर अवलंबून रहावे लागणार आहे. रत्नागिरीतून आतापर्यत सर्वाधिक ५६४ एसटी आरक्षित झाल्या आहेत. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी रत्नागिरी सर्वाधिक गाड्यांचे तिकिट प्रवाशांनी आरक्षित केले आहेत. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात येते.
एसटीची आरक्षण स्थिती
- मुंबई – ७८
- पालघर – ३८
- रायगड – ३५
- रत्नागिरी – ५६४
- ठाणे – ९१
- एकूण – ८०६







