पुणे : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू आहे. या प्रकरणात सिया आणि तिचा कथित मित्र चेतन यांना पोलिसांनी अटक केली असून, दोघांचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी सियावर गंभीर आरोप करत ती वारंवार पार्टीला जात होती आणि मद्यपान करत असल्याचा दावा केला आहे. मात्र, हे सर्व आरोप सियाची आई पूजा गोयल यांनी फेटाळून लावत आपल्या मुलीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. पूजा गोयल यांनी सांगितले की, या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्यात स्वतःची मुलगी दोषी आढळली तरी तिच्याबाबत कोणतीही दया दाखवू नये. सिया दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास तिलाही कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, सिया आणि केतन यांच्या विवाहाबाबत दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते. केतनच्या कुटुंबाने सियावर भरभरून प्रेम केले होते. तिच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. साखरपुड्यानंतर सियाने लग्नाबाबत कोणतीही नाराजी व्यक्त केली नव्हती. तिला काही अडचण किंवा शंका असती तर तिने ती कुटुंबीयांसमोर मांडली असती, असेही पूजा गोयल यांनी सांगितले. चेतनबाबत आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. साखरपुड्यानंतर ती केवळ केतनशीच संवाद साधत होती, असा दावाही त्यांनी केला.
पूजा गोयल यांनी लग्नाच्या तयारीबाबतही स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, उदयपूर येथील एका आलिशान विश्रांतीस्थळी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला होता, तर संपूर्ण विवाह सोहळ्यावर सुमारे पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, लग्नासाठी १७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते किंवा दोन विमाने आरक्षित करण्यात आली होती, या सर्व चर्चा निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सियाचे वडील प्रवीण गोयल यांनीही न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, केतनच्या कुटुंबीयांकडून आता सियाविषयी अनेक आरोप केले जात आहेत. मात्र, हे सर्व प्रकार यापूर्वी आमच्या निदर्शनास आणून दिले असते, तर आम्ही मुलीला समज दिली असती, आवश्यक ती कठोर भूमिका घेतली असती किंवा योग्य निर्णय घेतला असता. परिस्थिती इतकी गंभीर होण्यापूर्वी याची माहिती मिळाली असती, तर कदाचित ही घटना टाळता आली असती, असेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणानंतर सिया गोयलच्या कुटुंबालाही मोठा मानसिक धक्का बसला असून, प्रवीण गोयल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.







