मुंबई : अटल सेतूवरील वाढत्या मृत्यूंच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न राज्याच्या पावसाळी अधिवेशनात ऐरणीवर आला. गेल्या तीन वर्षांत पुलावर घडलेल्या १५ घटनांचा मुद्दा विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करण्यात आला. आमदार उमा खापरे यांनी अटल सेतूवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. चर्चेदरम्यान ७ जून २०२६ रोजी घडलेल्या एका घटनेचाही उल्लेख करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पुलावरील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्याची आणि अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली. सभागृहात मांडण्यात आलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये अशा सहा घटना घडल्या असून त्यापैकी चार जणांचे मृतदेह सापडले, तर दोन जणांचा शोध लागला नाही. २०२५ मध्येही सहा घटना घडल्या असून पाच जणांचे मृतदेह सापडले, तर एका नागरिकाचा जीव वाचविण्यात यश आले. २०२६ मध्ये आतापर्यंत तीन घटना घडल्या असून त्यापैकी दोन जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत.
या विषयावर झालेल्या चर्चेत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी अटल सेतूवरील पोलीस गस्त वाढविण्याबरोबरच समुद्रातील शोधकार्यासाठी तटरक्षक दलाची मदत घेण्याची मागणी केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनीही पोलिसांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करत सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर उपरोधिक टिप्पणी केल्याने सभागृहात काही काळ हशा पिकला. दरम्यान, शासनाच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना अटल सेतूवर सध्या तीन मीटर उंचीचे ध्वनिरोधक आणि पाच मीटर उंचीचे दृश्य प्रतिबंधक बसविण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतरही घटना घडत असल्याची बाब त्यांनी मान्य केली. पुलावरील उर्वरित भागांमध्ये सुरक्षा जाळ्या आणि उंच संरक्षक अडथळे उभारण्याच्या दृष्टीने तांत्रिक व्यवहार्यता तपासून तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने सभागृहात दिले. त्यामुळे अटल सेतूवरील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुढे कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







