वृत्तसंस्था : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करारावरून निर्माण झालेला वाद अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र आहे. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल कराराच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून या निर्णयावर सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री मुसादिक मलिक यांनी इस्लामाबाद येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत भारतावर गंभीर आरोप करत प्रक्षोभक वक्तव्य केले. त्यांनी दावा केला की, शेजारील देश पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचे नाव स्पष्टपणे न घेता त्यांनी पाण्याचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आणि पाकिस्तानच्या वाट्याच्या पाण्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत धमकीवजा वक्तव्यही केले.
याच पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनीही भारताच्या निर्णयावर टीका केली. सिंधू जल करार हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा करार असून तो भारताला एकतर्फी रद्द किंवा स्थगित करता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी यापूर्वीच पाणी हा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय असल्याचे स्पष्ट केले असल्याची आठवण त्यांनी करून दिली. या वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने इस्लामाबाद येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजनही केले आहे. दरम्यान, भारताने या विषयावर यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट करत दहशतवाद आणि द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर घेतलेले निर्णय देशाच्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊनच घेतले जात असल्याचे म्हटले आहे. सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांतील तणाव कायम असून पुढील घडामोडींवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष लागले आहे.







