मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यविधीला विरोध होत असून दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे. या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सोमवारपर्यंत अक्षय शिंदेंच्या मृतदेहाचे दफन करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच यासाठी राज्य सरकार जागा देणार असल्याचेही वकिलांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याची पोलिसांच्या चकमकीत एन्काऊंटर झाला. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यविधीला बदलापूरकरांचा मोठा विरोध पाहायला मिळाला होता. तसेच बदलापूरमध्ये त्याचा मृतदेह दफन करु देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. याविरोधात अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना उच्य न्यायालयात धाव घेतली होती.
अक्षयच्या मृतदेहाची अवहेलना होत असून त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे.