कल्याण : उल्हासनगर पोलिसांनी पॉर्न स्टार रिया बर्डेला अटक केली आहे. भारतीय पोर्न इंडस्ट्रीत रियाला आरोही बर्डे आणि बन्ना शेख या नावानेही ओळखले जाते. रिया बर्डे हिच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे भारतात राहिल्याचा आरोप असून या आरोपामुळे तिला उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी आयपीसी ४२०, ४६५, ४६८, ४७९, ३४ आणि १४अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया मूळची बांगलादेशी असून तिची आई, भाऊ आणि बहीण बनावट कागदपत्रे बनवून भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचा आरोप आहे. विशेष बाब म्हणजे बांगलादेशी असूनही रियाच्या आईने भारतीय कागदपत्रे मिळवण्यासाठी अमरावती येथील एका व्यक्तीशी लग्न केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात रियाशिवाय तिची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख यांनाही आरोपी केले आहे. हिललाइन पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अटक करण्यात आलेली रिया अनेक प्रोडक्शन हाऊसशी संबंधित असून तिने अनेक पॉर्न फिल्म्समध्ये काम केले होते. याशिवाय रियाला पॉर्न इंडस्ट्रीत आरोही या नावानेही ओळखले जाते. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तपासात रियाची आई अंजली ही बांगलादेशची रहिवासी असून ती आपल्या दोन मुली रिया आणि मुलासह भारतात अवैधरित्या राहत होते. रियाच्या आईने अमरावती येथील रहिवासी असलेल्या अरविंद बर्डे यांच्याशी विवाह केला, त्यांनी पश्चिम बंगालचे रहिवाशी असल्याचा दावा केला आणि नंतर स्वत: आणि तिच्या मुलांसाठी बनावट जन्म प्रमाणपत्र आणि इतर बनावट कागदपत्रे बनवून भारतीय नागरिकाचा पासपोर्ट मिळवला. रियाला यापूर्वी मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अनैतिक वाहतूक कायद्यांतर्गत अटक केली होती. रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याला ती मूळची बांगलादेशची असून बेकायदेशीररीत्या देशात राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी त्यांची कागदपत्रे तपासली आणि त्यानंतरच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.