ठाणे : ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गंभीर आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून आणि नगरसेवक गितेश राऊत यांची पत्नी गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आपल्या तक्रारीत गिरीजा राऊत यांनी विवाहानंतर सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. तसेच बळजबरीने गोमूत्र पाजण्यात आले, डोक्यावरील केस कापण्यात आले आणि विविध प्रकारच्या अघोरी कृत्यांना सामोरे जावे लागल्याचाही दावा त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना गिरीजा राऊत यांनी विनायक राऊत कुटुंबासोबतचे अनेक अनुभव कथन केले. त्यांनी आरोप केला की, विनायक राऊत हे त्यांच्या कुटुंबासोबत राहत नसून दुसऱ्या पत्नीसमवेत स्वतंत्र राहत होते. दुसरे लग्न आणि स्वतंत्र कुटुंब असल्याची माहिती आपल्यापासून लपविण्यात आली होती, असा दावाही त्यांनी केला. नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशीच ते घरी येत असत, तर इतर वेळी केवळ फोनवरून घरातील जबाबदाऱ्यांबाबत सूचना देत असत, असेही त्या म्हणाल्या. गिरीजा राऊत यांनी पुढे असा आरोप केला की, आपल्या वागण्या-बोलण्यापासून कपडे घालण्यापर्यंत अनेक बंधने घालण्यात आली होती. सासूच्या पद्धतीनेच राहण्यास भाग पाडले जात होते. तसेच पती गितेश राऊत घरात आणि बाहेर वेगवेगळ्या प्रकारे वागत असल्याचा, शिवीगाळ करत असल्याचा आणि सात वर्षे विविध प्रकारे छळ केल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व आरोपांमुळे या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, माजी खासदार विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. गिरीजा आणि गितेश राऊत मागील तीन वर्षांपासून एकत्र राहत नसल्याचे सांगत त्यांनी तक्रारीतील आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१८ मधील कथित घटनांबाबत २०२६ मध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच या काळात गिरीजा राऊत यांच्या आई-वडिलांची साथ त्यांना होती, असेही त्यांनी नमूद केले. सध्या दोघांमधील घटस्फोटाची प्रक्रिया न्यायालयात सुरू असून, गिरीजा राऊत यांनी दरमहा पाच लाख रुपयांचा खर्च, दहा कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम, दोन कोटी रुपयांची मानसिक नुकसानभरपाई, पाच खोल्यांचे घर आणि स्वयंचलित कारची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला. या मागण्या पूर्ण न झाल्यामुळेच तक्रार करण्यात आल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला. अघोरी उपचार किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या विधींशी आपला किंवा कुटुंबाचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गिरीजा राऊत यांचे वकील सागर कदम यांनी या प्रकरणात महाराष्ट्र नरबळी व इतर संबंधित कायद्यांनुसार कारवाई व्हावी, तसेच तक्रारीतील सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणातील आरोप आणि प्रत्यारोपांमुळे प्रकरणाला मोठे राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले असून, पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.






